Skip to main content

14 एप्रिल डॉ.बाबासाहेबांच्या जयंती / Dr.babasaheb jaynati

 "काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडतील.माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी तरुणांना भगवान बुद्धांचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले....बौद्ध धर्म जातीविरहित एकजीनसी समाज रचनेचा पुरस्कार करतो, तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. "(नवी दिल्ली २ मे. 1950)* 

मित्रांनो,आता 14 एप्रिल डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीची आम्ही तयारी करीत आहोत,मग त्यानिमित्ताने सभा व वर्गणी गोळा करण्याचे आमचे काम चालू झाले असेल.संपूर्ण भारतात 6लाख गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते,एक गावाची सरासरी वर्गणी जर रु 10000/-पकडली तर 6लाख गावाची वर्गणी किती?600000×10000=6000000000/-म्हणजे 6 अब्ज,आणि एवढा प्रचंड पैसा आम्ही बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आनंद,जल्लोष करण्याकरिता,DJ लावून नाचण्याकरिता,मिरवणुका काढून ,कपाळाला नीळ लावून,दारू ढोसून नाचण्यावर घालवतो. *"चंदे का धंधा बंद करो"* एका शहरांमध्ये एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आपला संघ दाखवायचा आहे.संघ/संख्या, ताकत/शक्ती  दाखवायची आहे. एक गाव एकच मिरवणूक काढा भले तुम्ही नंतर किंवा आधी आपल्या आपल्या वार्डामध्ये कार्यक्रम घेतले तरी चालेल परंतु 14 एप्रिल ला पूर्ण गावातले लोक एकाच ठिकाणी जमा, सर्व एकत्र येऊन जयंती साजरी करा. आपल्या बाबांची जयंती आहे, वडील/आपण/मुले सगळ्यांचे वडील आपले एक आहे याचे भान ठेवा.सर्व एकत्र एकाच ठिकाणी जमा, त्यामुळे,बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्याकरिता,त्यांचं आंदोलन पुढे नेण्याकरिता,त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्यातला एकही पैसा खर्च करीत नाही,काय बाबासाहेबाना हेच अपेक्षित  होतं?




      बंधूंनो त्यांचेच वाक्य,जे त्यांनी 17 ऑगस्ट 1952 रोजी सिद्धार्थ कॉलेज मध्ये घेतलेल्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले होते,"माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा ,माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याकरिता तुम्ही प्राणांची बाजी लावा",म्हणजे हे काम करीत असताना तुमचा प्राण गेला तरी त्याकरिता तयार असा परंतु मी पेटविलेला जागृतीचा अग्नी कधीही विझू देऊ नका,माझे अनुयायी जर हा गाडा पुढे नेण्यास अक्षम ठरले तर कोणत्याही परिस्थितीत हा मी इथवर मोठ्या कष्टाने,श्रमाने,आणलेले हक्क अधिकार संपुष्टात येऊ  देऊ नका,त्याकरिता सतत संघर्ष करीत राहा,मला तुम्ही माझे भक्त झालेले नाही आवडणार तर खरेखुरे माझे विचारांचे अनुयायी बना,मला अनुयायांची,निष्ठावान लोकांची गरज आहे.

   मग आज आम्ही समीक्षा करायला नको काय?काय आम्ही बाबासाहेबाना अपेक्षित असलेले कार्य करीत आहोत?

     आज बौद्ध समाजामध्ये भक्तांची संख्या बेसुमार दिसते आहे,अनुयायांची फारच कमी.हा भक्त वर्ग काय करतो की,वर्षाच्या 365 दिवसातून एक दिवस फक्त बाबासाहेबाना लक्षात घेतो व उर्वरित 364 दिवस झोपा काढतो,बाबासाहेबांचे वर्षभर काम करणारे त्यांचं आंदोलन,त्यांचा संघर्ष अविरत चालू ठेवणारे आज भारतात एकमेव संघटन आहे,अहो मी बघितले शिकलेले लोकही बाबासाहेबांच्या पुतळ्याला फक्त "हार"घालण्याकरिता या उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात तासन्तास 5-5,6-6घंटे रांगेत उभे राहतात आणि मी किती बाबासाहेबांचा भक्त आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात,काही बहाद्दर लोकं बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड म्हणून स्वतःच्याच घरात मस्तपैकी नाश्ता किंवा जेवणाचे कार्यक्रम घेतात आणि विहारात काय चालते?तिथेही सामूहिक भोजनाचे कार्यक्रम!काय तुमची भोजनाची समस्या आज आहे, आधीही भोजनासाठी आपण रांगेत लागत अशा पद्धतीचे कार्यक्रम करून वर्गणी मागण्यासाठी भिकारीपणा स्वीकारतो आणि भोजनासाठी रांगेत उभा राहून भिकारीपणा स्वीकारतो. आपली वृत्ती बदलवली पाहिजे,सर्व सुख तुमच्या पदरात बाबासाहेबानी टाकलेले आहे.बरं यादिवशी प्रबोधन शून्य.

 एके ठिकाणी बाबासाहेब असंही म्हणतात,"personally, I do not like the celebration of my birthday.I am too much democrat to relish man-worship which I regard as perversion of democracy".--Dr.Babasaheb Ambedkar. " *माझी चळवळ अमुक एका वर्गाची किंवा अमुक एका जातीच्या उन्नती करिता नसून,ती सर्व अस्पृश्यांच्या उन्नती करिता आहे. दुर्दैवाची किंवा सुदैवाची गोष्ट ही कि ती चळवळ एकट्या महार समाजाने चालवली आहे ,इतर जातींनी जर ती हाती घेतली तर मी महार जाती सांगेल की तुम्ही स्वस्थ बसा. आतापर्यंतची चळवळ झाली तिचा फायदा एकट्या महार जातीला न होता चांभारांना व मांगांनाही झाला* आहे.(पनवेल २९फेब्रु.१९३६)या देशातील अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना तर संपूर्ण जीवनातील कमाई मी त्यांना अर्पण केलेली आहे.

    मग बंधूंनो बाबसाहेबच खुद्द असं म्हणत असतील तर आज काय चित्र आहे बघा, जळगाव,अमरावती आणि अनेक महाराष्ट्रतील मोठ्या, छोट्या शहरात आता ही पद्धत सुरू झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ काही राजकारणी लोक आमच्याच लोकांना घेऊन 14 एप्रिल ला 125 व्या जयंतीनिमित्त तब्बल 125 किलोचा CAKE रात्री 12 वाजता कापून फटाके फोडतात,मला सांगा बाबासाहेबाना कधीतरी त्यांच्या जीवनात केक खायला मिळाला असेल का?मग आम्ही किती विडंबन करतो आमच्या नेत्याचं? प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करा, संविधान आजही अनेक लोकांना माहिती नाही त्या साठी विविध कार्यक्रम आयोजित करा,

    वर दिलेल्या 6 अब्ज रुपयांपैकी फक्त 10 % तरी आम्ही बाबासाहेबांच्या आंदोलनावर खर्च करतो का?याचा जयंतीच्या निमित्ताने आपण नक्की विचार करावा असे मला वाटते.

 *जयभीम -नमोबुद्धाय* 

सरोजिनी गांजरे लभाने-जळगाव

Comments